

विशेष उपस्थिती
पंडित विकास कशाळकर
सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, अध्यक्ष - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई
उस्ताद उस्मान खान
जगप्रसिद्ध सितार वादक व डीन - टेंपल ऑफ फाईन आर्ट्स
श्री. वसंतराव पलुस्कर
पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे नातू व पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचे चिरंजीव
आयोजक
विश्व मराठी परिषद
सहयोग

शिक्षण प्रसारक मंडळ, कुरुंदवाड
मुख्य प्रायोजक
पुसाळकर सुरक्षा कॉम्पोनंटस प्रा. लि.
सह प्रायोजक
स्वातंत्र्य सेनानी कै. श्रीपाल आलासे (काका)
कुरूंदवाड अर्बन कॉ. ऑप. बँक लि. कुरूंदवाड
डिजिटल निर्मिती सहयोग

भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज
मुख्य प्रायोजक
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइजर्स लि.
सह प्रायोजक

श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि. कोल्हापूर
संकल्पना
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे भीष्म पितामह (Father of Indian Classical Music) म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १८७२ मध्ये श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला कुरुंदवाड येथे झाला. त्यांनी स्वातंत्रपूर्व काळात संपूर्ण भारतवर्षामध्ये अभिजात संगीताचे शिक्षण व प्रशिक्षण, संरक्षण, संवर्धन, संशोधन त्याचबरोबर प्रचार प्रसाराचे अभूतपूर्व कार्य केले. त्यांनी इस १८८६ ते १८९६ या दरम्यान गुरुवर्य गायनाचार्य पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचेकडून मिरज येथे गुरुकुल परंपरेने प्रखर साधना करून ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात केली. त्यानंतर ते आपले नशीब आजमवण्यासाठी मिरजेतून बाहेर पडले. मजल-दरमजल करीत त्यांनी बडोदा हे संगीतप्रेमी संस्थान गाठले. तेथे त्यांचा विलक्षण प्रभाव पडला आणि त्यांना अलोट प्रसिद्धी मिळाली. यानंतरही पंडितजींनी तेथेच न थांबता अखंड भारतामध्ये भ्रमण करण्याचे ठरविले. दिल्ली, जालंधर, लखनौ असे करून ते अखेर लाहोर येथे पोहोचले. ५ मे १९०१ या दिवशी त्यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. हा क्षण म्हणजे भारतीय संगीत कलेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला. दरबारांमध्ये आणि राजे-रजवाड्यांमध्ये अडकलेल्या शास्त्रीय संगीताचा दैवी प्रवाह त्यांनी मुक्त केला आणि लाखो सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचवला. संगीत शिक्षणाचा शैक्षणिक पाया रचला. त्यांच्या आयुष्यात त्यांनी शेकडो शिष्य तयार केले आणि लाखो श्रोते (अर्थात कानसेन!) तयार केले. संगीत ही एक कला आहे आणि इतर कलाकारांना - चित्रकार, मूर्तिकार - जसा समाजात मान मिळतो तसाच तो गवयाला सुध्दा मिळाला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्या काळात गवई म्हणजे तो व्यसनाधीनच असणार अशी समाजात एक समजूत होती. ती नष्ट करण्यासाठी त्यांनी त्यांचा जो शिष्यवर्ग तयार केला तो अतिशय चारित्र्यसंपन्न आणि निर्व्यसनी असाच होता. संगीतकला, गायक, वादक यांना प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळवून दिला. नंतरही त्यांच्या शेकडो शिष्यांनी अखंड भारतात हजारो शिष्य घडविले आणि संपूर्ण भारतामध्ये संगीतकलेचा प्रचार केला. आजमितीला भारतामध्ये ९०० हून अधिक संस्था तर भारताबाहेर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांतील संस्था अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाबरोबर संलग्न आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी मंडळाच्या परीक्षांसाठी नोंदणी करीत आहेत.
प्रख्यात गायक आणि नंतर संपूर्ण भारतातील पहिले सर्कसकार म्हणून प्रसिद्ध झालेले विष्णूपंत छत्रे यांनी कुरुंदवाड येथे संपूर्ण भारतातील प्रसिद्ध गायक भूगंधर्व मरहूम उस्ताद रहिमत खाँ यांना आणले आणि रहिमतखाँ यांचे जीवन येथेच व्यतीत झाले. त्यांची दफनस्थळ कुरुंदवाड येथेच आहे. जवळच मिरज हे ख्यातनाम गायक मरहूम उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या किराणा घराण्यामुळे आणि संगीत वाद्यांच्या निर्मितीचे शहर म्हणून प्रसिद्धीस आलेले शहर आहे. इचलकरंजी हे गायनाचार्य पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर आणि द. वि. काणेबुवा यांचे गाव. कोल्हापूर ही जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक मरहूम उस्ताद अल्लादियाँ खाँ यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अशाप्रकारे कुरुंदवाड, मिरज, इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर हा प्रांत म्हणजे भारतातील सर्व संगीत घराण्यांसाठी, गायक, वादक कलाकारांसाठी आणि लाखो श्रोत्यांसाठी आत्यंतिक श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा आणि कृतज्ञतेच्या भावनेने ओथंबलेला असा परिसर आहे. आयुष्यात एकदा तरी या पुण्यभूमीमध्ये आपली कला सेवा सादर करावी असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला कुरुंदवाड येथे पटवर्धन हे अतिशय सुसंस्कृत घराणे संस्थानिक म्हणून राज्य करीत होते. कुरुंदवाड, मिरज, इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर हा संपूर्ण परिसर म्हणजे संगीताची सुवर्णभूमी होती. कुरुंदवाडची ओळख तर ‘भारताची गंधर्वनगरी’ अर्थात Music City of India अशी होती. पंडितजींना जाऊन आता ९० वर्षे झाली. कुरुंदवाड या त्यांच्या जन्मभूमीचे आकर्षण हजारो कलाकारांना आणि लाखो श्रोत्यांना आहे. संगीत क्षेत्रातील या युगपुरुषांच्या जन्मस्थळी जेथे त्यांचे बालपण व्यतीत झाले त्याठिकाणी आपली संगीतसेवा सादर करण्याचे स्वप्न हजारो गायक, वादक आणि कलाकार पाहत असतात.
याशिवाय कुरुंदवाडजवळ श्रीनृसिंहसरस्वती या श्रीदत्तात्रेयांच्या कलियुगातील दुसऱ्या अवताराचे अत्यंत जागृत असे स्थान आहे. नृसिंहवाडीला श्री दत्तात्रेयांची राजधानी असे म्हटले जाते. श्रीदत्तात्रेयांना संगीत आणि गायनसेवा अतिशय प्रिय आहे. दरवर्षी लाखो दत्तभक्त नृसिंहवाडीला भेट देतात. तसेच अनेक दिग्गज कलाकार आपली सेवा श्री दत्तचरणी रुजू करतात. कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचा संगम येथे आहे. कुरुंदवाड शहराला या दोन्ही नद्यांनी जणू प्रदक्षिणा घातली आहे. अतिशय संपन्न आणि सुबत्ता असलेला हा परिसर आहे. त्याचबरोबर धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरांनी युक्त असे विलक्षण आत्मीय समाजजीवन तेथे अजूनही अनुभवायला मिळते.
पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे जाज्वल्य देशभक्त होते. त्यांनी "वंदे मातरम्" आणि अनेक राष्ट्रीय गीतांना चाली लावल्या आहेत. राष्ट्रीय कॉँग्रेसच्या अधिवेशनाची सुरूवात त्यांच्या वंदे मातरम् गायनाने होत असे. म. गांधी, सरदार पटेल आदी कॉँग्रेस पुढाऱ्यांना आणि नेत्यांना त्यांच्याबद्दल कमालीचा आदर होता. "रघुपती राघव राजाराम... पतित पावन सीताराम" या प्रसिद्ध भजनालाही त्यांनी चाल लावलेली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात, संगीत क्षेत्रातील या युगपुरूषाला आणि महान देशभक्ताला अभिवादन करण्यासाठी विश्व मराठी परिषदेने कुरुंदवाड नगरीमध्ये २२ आणि २३ जानेवारी २०२२ रोजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाची संकल्पना पं. विकास कशाळकर यांची असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई ही संस्था या संगीत महोत्सवासाठी सहयोगी संस्था म्हणून सहभागी होत आहे. याचबरोबर संपूर्ण देशातील अनेक संगीत संस्था या महोत्सवासाठी सहकार्य करीत आहेत.